गणित सुटलं! महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला

06 Mar 2024 15:20:12

shindepawar 
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) महायुतीची (grand alliance) रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं पुढे आले आहे. महायुतीत ३२ जागा भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena) ११ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
 
शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघाला आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण १६ जागा दिल्या जातील. त्यातील ११ जागा शिवसेनेला तर ५ जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे. रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवतील.
 
मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन शाह यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत सर्वकाही अंतिम करण्यात आले. सुरुवातीला शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली.
 
सूत्रांनुसार, ही बैठक ४५ मिनिटे चालली. त्यात बहुतांश जागांवर एकमत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्या आधारे जागा मिळतील. काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंसोबत १३ खासदार आले आहेत.
Powered By Sangraha 9.0