सर्व वाचकांना नमस्कार! सदर लेखात प्रभू श्री रामचंद्रांची प्राप्ती शिव पासून कशी करता येईल हे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्ञान सागरातील काही मोती निवडून त्यांचे सौंदर्य व शिव ध्यान करता करता नारायण अर्थात विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्रांची प्राप्ती कशी होते ह्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न येथे करीत आहे.
आदियोगी, वेद ज्ञाता, ध्यानमूर्ती, सर्वलोक पालक, देवाधिदेव महादेव ध्यान मग्न असताना ज्या नामाचे जाप करतात ते वीआक्षरी नाम म्हणजे राम. राम नाम ध्यानाचे महत्त्व काय हे त्यांनी सर्वांना समजावून राम नामामृत प्रदान केले. बुधकौशिक ऋषी विरचित रामरक्षा स्तोत्र ह्याचे उत्तम प्रमाण आहे. राम नाम ध्यानाने रामाची प्राप्ती होईल पण शिव पासून राम प्राप्ती कशी होणार? हा प्रश्न नक्की उद्भवेल. त्याचे उत्तर आहे शिव रुद्र अवतारी, रामभक्त, महाबली हनुमान अर्थात मारुती रायांचे ध्यान करणे.
आपलया बुद्धीला व मनाला चांगल्या किंवा वाईट कार्यात रुजू करायला शरीरातील वायू महत्त्वाची भूमिका साकारतो. "डोक्यात हवा शिरली” किंवा “ह्याला वारा लागला" हे आपण बऱ्याच वेळा ऐकल असेल. नेमका आता ह्या वा महत्त्व काय? हे आपण जाणून घेऊया. आपले मन, चित्त जेव्हा विचलित होते, क्रोध, मत्सर, घृणा, कुविचार, मनात शिरतात तेव्हा आपल्या श्वासाची गती तीव्र होते. प्रत्येक विचलित भावनेत जेव्हा मन गुंतते तेव्हा वायूची गती तीव्र होते व मन भ्रमित होते. अशावेळी मनाला शांत व एकाग्र करण्याकरिता श्वासावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. हा वायू नियंत्रित करून विचलित असलेले मन प्रभू चरणी स्थिर करण्या करिता उत्तम मार्ग म्हणजे पवनपुत्र हनुमंताची भक्ती करणे, त्यांचे ध्यान करणे.
हनुमंताने कडून संपूर्ण सृष्टी बळ, अभय, संरक्षण, सिद्धी, बुद्धी, ज्ञान, संपत्ती, शत्रू विनाश, सुख ह्या सर्व गोष्टी दन म्हणून मागतात. त्यांच्याकडून मागायच विसरतात ते म्हणजे "भक्ती मार्ग" आणि "राम नाम". ज्याने ह्या २ गोष्टी मिळवल्या त्याने सर्व काही प्राप्त केलं आयुष्यात. स्वयं हनुमंतानी भौतिक, लौकिक, कुठलीही संपत्ती सोबत ठेवली नाही किंवा मागितली नाही. त्यांच्या कडे असलेले सर्व बळ, सिद्धी, ज्ञान, निधी, हे सर्व राम नाम भक्ती मुळे होते. "भक्ती” अन "राम नामामृत्” प्राप्त करण्या करीत हनुमंताची भक्ती करावी.
समर्थांनी जसे मारुती स्तोत्रात लिहिले "रामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती" किंवा तुलसीदास ह्यांनी हनुमान चालीसा मध्ये लिहिले "तुम्हरे भजन राम को पावे" किंवा "रामरसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा"
अर्थात रुद्र अवतारी हे सर्व दुःख हरून राम नामाची प्रभू श्री रामांची प्राप्ती करून देतात. हनुमंताची भक्ती तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्ती करिता व्यायाम व शरारिक श्रम करायला प्रेरित करते. त्यामुळे तुमची एकाग्रता व बळ वाढेल. लक्षात असावे भक्ती अन् राम नाम मागून हनुमंताचे ध्यान केल्यास हे प्राप्त होईल. बळ अन् एकाग्रता ह्याने तुम्ही सरलतेने ध्यान करू शकाल. ध्यान धारणा सरल झाल्याने तुम्ही प्राणवायू वर नियंत्रण मिळवाल. नियंत्रित वायू, बळ, एकाग्रता तुम्हाला कुंडलिनी योगात सहाय्यक ठरेल. कुंडलिनी साधनेने योग्य मार्गदर्शनाने तुम्हाला अध्यात्मातील अलौकिक ज्ञान प्राप्त व्हायला सुरुवात होईल. ह्या प्रवासात अंततः तुम्ही सर्वोत्तम नाम म्हणजेच राम प्राप्त कराल. हे राम नाम प्राप्त झाल्यावर तुम्ही सर्व चक्रातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त कराल. लक्षात ठेवावे "राम" प्राप्तीचा प्रयत्न मोक्ष प्रदान करतो " मोक्ष" प्राप्तीची लालसा अज्ञान व अहंकार देईल. हेतू "राम" प्राप्तीचा असल्यास हनुमंत दिशादर्शक व गुरू म्हणून उभे राहतील अन् अंततः राम नाम गोडीने आयुष्य परिपूर्ण होईल.
शब्द मर्यादा लक्षात घेता ह्या लेखाचे समापन करतो.
"जय श्री राम"
लेखक
रुद्रांश
(प्रथमेश सिद्धार्थ तायडे)